नांदेड – प्रतिनिधी
आजकालच्या धावपळीच्या जीवनात बऱ्याच लोकांना कंबरदुखीला सामोरे जावे लागते . शंभरातुन कमीत कमी अंदाजे ४० ते ५० लोकांना कंबरदुखीचा त्रास असतो . प्रथमतः आपण कंबरदुखीची मुख्य कारणे व त्यावरील उपचार पद्धती बद्दल जाणून घेऊयात . दिवसातून कधी ना कधी प्रत्येकालाच कंबरदुखीचा त्रास सोसावा लागतो
कंबरदुखीची प्रमुख कारणे :
१) सरकलेली मणक्यातील गादि :- माणसाच्या शरीरातील पाठीचा कणा ३३ मणक्यांनी बनलेला असतो त्यातील वरच्या चोवीस मणक्यात गादी (Intervertebral Disc ) असते , नंतरची पाच सॅक्ररम व चार कॉकीक्स ची एकमेकांना जोडलेली असतात हि गादी शॉक अँबझाँरबरच काम करते. काही कारणांमुळे जेंव्हा हि गादी तिच्या नियमित जागेवरून सरकून मागे येते व त्यामुळे दोन मणक्यातून मज्जातंतूपासून बाहेर निघणाऱ्या नसांवर दाब पडतो व नसांवरसूज येते या सुजेमुळे कंबर दुखणे , पायात वेदना होणे , मानेत त्रास होणे , हातापायात मुंग्या येणे अशाप्रकारचे त्रास संभवतात
२) तांत्रिक कारण :- साधारणतः बऱ्याच रुग्णांच्या कंबर दुखीचे कारण हे तांत्रिक असते . ज्यात मणक्यातील गादीचा ऱ्हास होतो. दैनंदिन कामात व्यक्तीची चुकीची बसण्याची पद्धत ,चालण्याची पद्धत झोपण्याची पद्धत, यामुळे पण कंबर दुखणे उद्भवते .
३) मार लागणे :- पाठीच्या कण्याला अपघातात , काम करताना , ओझे उचलताना जर इजा झाली , अपघातामुळे मणक्याचे फ्रॅक्चर होणे हे सुद्धा कंबरदुखीचे कारण ठरू शकते .
४) पाठीच्या कण्याचे आजार :- बरेच शारीरिक आजार हे कंबरदुखीचे मूळ असू शकतात , जसे कि जन्मतः वाकडे मणके (scoliosis —- kyphosis —-) , एकमेकांवर सरकलेले मणके ,संधिवात , अंकायलोसिंक, स्पॉण्डिलायटिस इतर .
कंबरदुखीचे उपचार :-
१) व्यायाम ;- कंबरदुखीचे उपचार हे त्याच्या कारणांवर अवलंबून असतात . बऱ्याचवेळा कंबरदुखी योग्य मार्गदर्शनाखाली केलेल्या नियमित व्यायामामुळे पण बरी होऊ शकते .
२) मेडिसिन :- कंबरदुखी साठी योग्य तज्ञ डाँक्टरांकडून योग्य ती औषधी नियमित घेतल्यास कंबरदुखीवर फरक पडू शकतो .
३) इंटरव्हेंशनल पद्धती :- हि पद्धत म्हणजे शरीराला कमीत कमी इजा करून विना ऑपरेशन योग्य त्या ठिकाणी मणक्यांमध्ये इंजेक्शनने औषधी देणे ,
ह्या पद्धतीत पाठीच्या कण्यातील मणक्यांमध्ये इंजेक्शन देणे , नसेमध्ये इंजेक्शन देणे दोन मणक्यातील सांध्यात इंजेक्शन देणे असे असतात . हि पद्धत जर रुग्णाची कंबरदुखी व्यायाम व औषधे घेऊन कमीच होत नसेल व ज्यांना ऑपरेशन करण्याची इच्छाच नसेल किंवा भीती वाटत असेल त्यांच्यावर केल्या जातात ,
ह्या पद्धतीचे काही फायदे आहेत
१) रुग्णास पूर्ण भूल ( General Anaesthesia ) देण्याची गरज पडत नाही .२) ऑपरेशन टाळता येते ३) दवाखान्यात भरती होण्याची गरज नसते ,४) आर्थिक दृष्ट्या कमी खर्चात होते,
काही परिस्थितीत ऑपरेशन हाच पर्याय असतो .
कंबरदुखीच्या ईंटरव्हेंशनल पद्धतीचे प्रकार :-
पाठीच्या मणक्यातील इंजेक्शन ————–
१) रूट स्लिव्ह ब्लॉक :- ह्यामध्ये मज्जातंतूतून निघणाऱ्या ज्या नसांवर सूज आलेली असते या सुजेमुळे रुग्णाच्या कंबरेत दुखणे , पायात दुखणे ,मुंग्या येणे, असा त्रास होतो . अशा रुग्णात या सूज आलेल्या या सूज आलेल्या नसांमध्ये योग्य ती औषधी दिली जाते . जेणेकरून नसांवरील सूज कमी होऊन रुग्णाला होणारा त्रास कमी केला जातो .
२) फॅसेट जाँईंट ब्लॉक / मीडियन ब्रँच ब्लॉक :- पाठीच्या कण्यातील मणक्यातील सांध्यात पाणी जमा होऊन सूज येऊन कंबरदुखी होते . ह्यात त्या सांध्यामध्ये योग्य ती औषधी दिली जाते ,जेणेकरून रुग्णाचा त्रास कमी होईल
३) इपिड्युरल इंजेक्शन ब्लॉक :- ह्यामध्ये पण मज्जातंतूच्या वरील आवरणातील जागेत इंजेक्शन दिल्या जाते . ज्यामुळे मज्जातंतून निघणाऱ्या —– नसावरील दाब कमी होऊन इजा कमी होते .
४) ओझोन डिसेक्टॉमी :- ह्यामध्ये बाहेर आलेली मणक्यातील गादीत ओझोन इंजेक्शन देऊन गादीचा बाहेर आलेला भाग कमी करण्यात येतो . या बाहेर आलेल्या गादीमुळे मज्जातंतूतून निघणाऱ्या नसांवर दाब पडून होणारा कंबरदुखी , पायात दुखणे ,मुंग्या येणे हा त्रास बिना ऑपरेशन कमी होऊ शकतो …
डॉ. कृष्णा शेषराव जगदंबे
M.B.B.S. D.A. FPM (Delhi)
इंटरव्हेंशनल पेन फिजिशियन व कन्सलटंट अनास्थेशिस्ट, नवजीवन पेन मॅनेजमेंट सेन्टर ,बोरबन , नांदेड ..