एक सामान्य कामगार ते यशस्वी उद्योजक ..
शिवाजी तुळशीराम शिंदे यांचा जन्म १९६२ मध्ये मौजे हारेगाव ता. धर्माबाद जि. नांदेड येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण गावातून पूर्ण केले. हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबाद येथून १९७८ साली ते मॅट्रीक पास झाले. घरच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ शकले नाहीत. इ.स. १९८५ मध्ये शिवाजीराव नांदेड शहरात आले. प्रथम त्यांना मासिक २०० रूपये पगाराची नोकरी मिळाली. नंतर ‘कोहिनूर ऑईल मिल’मध्ये सेल्समन म्हणून नोकरी मिळाली. पूर्वीच्या तुलनेत पगारही वाढला. महिना ५०० रूपये मिळू लागला. १९८५ ते २००० या पंधरा वर्षांच्या कालावधीत त्यांनी याच कंपनीत काम केले.
या कालावधीत त्यांच्या कौटुंबिक जीवनात प्रगती झाली. विवाह झाला. मुलं झाली, स्वत:च्या मालकीचे घर झाले; परंतु शिवाजीरावांचे मन अस्थिर होते. खरे तर एखाद्या सामान्य विचारसरणीची व्यक्ती राहिली असती तर या प्रगतीवर त्यांनी समाधान मानले असते; परंतु अशा छोट्याशा प्रगतीचे समाधान मानणारे उद्योजक कसे होणार? शिवाजीरावांच्या मनात तर अजून काही वेगळे करून दाखविण्याची इच्छा होती. ‘कोहिनूर ऑर्ईल मिल’मध्ये काम करीत असतांना मला सातत्याने वाटत होते की, ‘आपला स्वत:चा कोणतातरी उद्योग असावा’ असे ते म्हणतात. म्हणूनच ते स्वत:चा स्वतंत्र उद्योग स्थापन करू शकले.
ते म्हणतात, ‘‘आपला स्वत:चा कोणता तरी उद्योग असावा, या विचाराने मी झपाटलेला होतो. इ.स. २००० साली ‘कोहिनूर ऑईल मिल’मधील नोकरी सोडण्याचे ठरविले. त्यावेळी मला मासिक ५००० रूपये वेतन होते; पंरतु स्वत:चा उद्योग सुरू करायचा असेल तर नोकरी सोडणे आवश्यक होते. गेल्या पंधरा वर्षांपासून ते उद्योगविश्वात वावरत होते. या अनुभवामुळे त्यांना अनेक माणसांना भेटता आले. अनेकांचे चढउतार त्यांनी पाहिले होते; आणि या बळावर स्वत:च्या पंधरा वर्षांच्या अनुभवामुळे त्यांनी उद्योग क्षेत्रात उतरण्याचे ठरविले.’’
भांडवलच्या तयारी पासून ते उद्योगाच्या पायाभरणी पर्यंत अनंत अडचणींचा सामना ..
भांडवल कसे उभारावे? हा शिवाजीरावांच्या समोरही प्रश्न होताच; परंतु उद्योग क्षेत्रातच नोकरी केल्यामुळे अनेकांची ओळख होती. त्या मित्र परिवाराकडून २,५०,००० रूपये आणि शंकर नागरी बँकेकडून १,५०,००० रूपये असे एकूण ४,००,००० रूपये भांडवलाची त्यांनी उभारणी केली. या चार लाख रूपयांच्या भांडवलातून एक टेम्पो विकत घेतला आणि सन २००० साली इतर कंपन्यांकडून खाद्यतेल घेऊन मोठ्या दुकानदारांना ते पुरवठा करू लागले. म्हणजे स्वत:ची इंडस्ट्री नसतांना इतर इंडस्ट्रीकडून खाद्यतेल घेऊन पुरवठा उद्योग सुरू झाला. या व्यवसायात त्यांनी चांगली प्रगती साधली. हळूहळू चार लाख रूपये कर्ज फेडले आणि स्वत: काही भांडवल जमा केले. आता त्यांना स्वत:ची इंडस्ट्री काढावयाची होती. त्या अनुषंगाने ते वाटचाल करू लागले. या काळात ते नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, तामसा, हदगाव व नांदेड तालुक्यात खाद्यतेल पुरवठा करायचे. अशाप्रमाणे शिवाजीराव शिंदे नावाचा शेतकर्याचा मुलगा एका कारखान्यात कामगार, सेल्समन म्हणून काम करीत असतांना आता स्वत: खाद्यतेल पुरवठा करणारा उद्योजक म्हणून नावारूपास आला.शिवाजीरावांनी वयाच्या ३८ व्या वर्षी हा स्वतंत्र व्यवसाय उभारला. त्यासाठी त्यांनी शिक्षण, पदवी, प्रशिक्षण वगैरे काही घेतले नाही. ते म्हणतात, ‘‘केवळ नोकरीच्या अनुभवातून हा उद्योग उभारण्यात आला. नोकरी करीत असतांना उद्योजकांशी संपर्क आला. त्यामुळे बँका, लहान व्यापारी, मोठे व्यापारी, कामगार व कर्मचारी या सर्वांशी कसे व्यवहार करावे हे मी शिकत गेलो.’’
तिरुमला ट्रेडींग फर्मची यशस्वी मूहूर्तमेढ ..
इ.स. २०१० साली नांदेडच्या एमआयडीसीत स्वत:ची इंडस्ट्री सुरू झाली. प्रथमत: ‘तिरुमला ट्रेडींग फर्म’ या नावाने खाद्यतेल पॅकींग उद्योगाची नाव नोंदणी करण्यात आली. याला पुढे ‘तिरुमला ब्रॅन्ड’ या नावाने प्रसिद्धी मिळाली. ‘तिरुमला ब्रॅन्ड’ हा आमचा ट्रेडमार्क आहे, असे शिवाजीराव सांगतात. सध्या त्यांचा कारखाना ‘संतोष इंडस्ट्री’ या नावाने चालू आहे.
या उद्योगासाठी लागणार्या मुलभूत गोष्टी म्हणजे जमीन, मनुष्यबळ, वीज, मशिनरीज, इमारत व भांडवल इत्यादी आहेत. या सर्व घटकांची माहिती पुढीलप्रमाणे : सध्या संतोष इंडस्ट्रीची २० गुंठे जमीन मालकीची असून त्यात ५००० स्क्वेअर फुटांची इमारत आहे. उद्योगासाठी लागणार्या सर्व मशिनरीज आहेत. उदा : खाद्यतेल डब्बा पॅकींग मशिन, पॉकेट पॅकींग मशिन, लॅमिनेशन मशिन इत्यादी. सध्या पाच आयचर टेम्पो आहेत. एकूण १० मजूर रोजमजुरीवर काम करतात अन् १० कर्मचारी मासिक वेतनावर काम करतात. त्यात ड्रायव्हर, सुपरवायझर, अकाऊंटंट, वॉचमन व व्यवस्थापक पदे आहेत. थोडक्यात एकूण १२ कर्मचारी या उद्योगात उदरनिर्वाह करतात. अर्थात २२ कुटुंबं या संतोष इंडस्ट्रीवर अवलंबून आहेत.
हैद्राबाद, मुंबई व नांदेड शहरातील काही ऑईल मिलमधून रिफाईन्ड ऑईल घेतो आणि ते रिफाईन्ड ऑईल डब्यात व पॉकेटमध्ये पॅक करून आमची कंपनी मोठ्या दुकानदारांना पुरवठा करते. सोयाबीन रिफाईन्ड, कॉटन रिफाईन्ड व पामोलिन रिफाईन्ड तेल पॅकींग करून विकण्याचे कार्य त्यांची कंपनी करते. नांदेड शहरात त्यांच्यासारखे खाद्यतेल पॅकींग उद्योजक सहा ते सात आहेत. तरीपण लोकसंख्या वाढल्यामुळे अशा अनेक उद्योजकांना या क्षेत्रात वाव असल्याचे ते सांगतात.
सध्या त्यांचा माल नांदेड, हदगाव, अर्धापूर, ढाणकी, उमरखेड, तामसा व कंधार इत्यादी ठिकाणी जातो. इतर अनेक ठिकाणांतील मोठे दुकानदार स्वत: येऊन कारखान्यातून तेल घेऊन जातात. या उद्योगात नफा कमी असला तरी धोका कमी असतो. कारण खाद्यतेल जीवनावश्यक वस्तू असल्याने उद्योग बंद पडण्याची भीतीच नाही.
बाजारात काय विकते यावर भर द्यावा. ग्राहकांचे समादान करता आले पाहिजे, सेवा वेळेवर द्यावी, वस्तूचा दर्जा सांभाळून ठेवावा, वाद टाळण्याचा प्रयत्न करावा, सहनशीलता असावी आणि संवादशैली आदरयुक्त असावी, असे त्यांनी आपल्या उद्योग क्षेत्रातील यशाचे रहस्य सांगितले.
२२ कामगार व कर्मचार्यांची रोजमजुरी व पगार वजा जाता मला वार्षिक १० ते १२ लाख रूपये निव्वळ नफा मिळतो.
संतोष इंडस्ट्रीज चे भविष्यातील पाऊल..
भविष्यातील योजनेविषयी ते म्हणतात, ‘‘सध्या माझ्या कारखान्यात २० मजूर आहेत. ती संख्या १०० पर्यंत वाढविण्याची माझी इच्छा आहे.’’ अशी दुर्दम्य इच्छा त्यांची आहे. शिवाजीराव शिंदे फार सकारात्मक विचारसरणीचे पुरस्कर्ते आहेत. ते म्हणतात की, प्रत्येक तरुणाने कोणता तरी उद्योग, व्यवसाय करावा जेणे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल; परंतु उद्योगात उतरण्यापूर्वी त्या क्षेत्राचा अनुभव घ्यावा. सध्या करण्यासारखे खूप उद्योग आहेत. शोध घ्या अन् उद्योग सुरू करा, असा संदेश शिवाजीराव तरुणांना देतात. सामाजिक बांधिलकी म्हणून ते विविध महामानवांच्या जयंतीनिमित्त जयंती मंडळांना वर्गणी देऊन सहकार्य करतात. उद्योजकांच्या युनियनमार्फत सार्वजनिक कामांना आर्थिक मदत म्हणून दरवर्षी ५००० रूपये देणगी देतात.
आलेल्या सर्व मर्यादांवर त्यांनी मात केली आणि आज ते एक उद्योजक म्हणून नावारूपाला आले आहेत. आजच्या तरुणांनी यातून प्रेरणा घेतली पाहिजे.
अधिक माहीतीसाठी संपर्क –
श्री. संतोष शिंदे,
संतोष इंडस्ट्रिज, प्लॉट न. ई- २७, एमआयडीसी, नांदेड- महाराष्ट्र,
संपर्क – ८८८८३२३७३०