
खरं तर मला हा लेख लिहायला फार उशीर झालाय पण वाचा पहा जमल तर विचार करुन. महाराष्ट्रात जवळजवळ 28 – 29 हजार ग्रामपंचायती आहेत. पण आदर्श ग्रामविकासाच्या बाबत आपणास फक्त अण्णा हजारेचे राळेगणसिद्धी व पोपटराव पवारांचे हिवरे बाजारच का आठवते. आज भारताला स्वातंत्र्य मिळुन 73 वर्षांचा काळ लोटला पण बोटावर मोजण्याइतकी गावे विकसित झाली. असे का व्हावे. इतर 29 हजार गावात शिक्षित, प्रामाणिक, तळमळीने काम करणारे लोक नाहीत का? निश्चितच आहेत. पण आपण स्वतःला वेगवेगळ्या गटातटात इतकं विभागून घेतलय की 73 वर्षात आपण विकासाचा गोवर्धन पर्वत उचलूच शकलो नाही. जर एकजुटीने ग्रामविकासाचा ध्यास घेतला असता तर कदाचित आज 29 हजार किंबहूना भारतातील 6 – 7 लाख गावे राळेगणसिद्धी व हिवरे बाजार झाली असती. आपल्या अनेक पिढ्या मागासलेपनातच बरबाद झाल्या. कित्येक गरोदर स्त्रिया रस्त्याअभावी दवाखान्यात वेळेत न पोहचू शकल्यामुळे मरन पावल्या. कित्येक गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा न पोहचू शकल्याने आजारी पडून लाखो लोक दगावली आणि दगावत आहेत. गावात चांगले शिक्षण नाही, ज्या वयात 11 (वर्षांपर्यंत) मुलांनी आई-वडीलांच्या छायेत वाढायच असतं अशा वयात त्याला गावातील शैक्षणिक सुविधेअभावी आई-वडिलांपासुन लांब तालुक्याच्या ठिकाणी ठेवावं लागतं. गावात वेळेवर लाईट नाही मुलांच्या अभ्यासाच काय? शासनाच्या अनेक योजना गावापर्यंत पोहोचतच नाहीत. त्याच काय? पांदन रस्त्याअभावी किंवा वादांमुळे शेतकऱ्यांना आपापसात भांडाव लागत प्रसंगी हानामारी होते. अशा वेळी गटातटात विभागलेले आपण काय वरील समस्या सामोपचाराने सोडवू शकू? कदापि शक्य नाही.
सर्वसामान्य परिस्थितीमध्ये जगतांना समस्यांची जाणीव होत नसेल कदाचित. पण ज्यांच्याकडे रहायला पक्के घरं नाहीत, लांबवर पायपीट करून पाणी भराव लागत प्रसंगी हानामारीवर यावं लागत, टॅंकरची तासनतास वाट पहावी लागते. अशा लोकांच व गावांच चित्र कधी बदलणार? हे चित्र बदलू शकते. पण त्यासाठी सगळ्यांनी आपला अहंकार बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील.
खरं तर विस्तीर्ण प्रदेशातील निवडणूका व त्यातील पक्षीय राजकारण वेगळे असते. गाव हा छोटा समुह असतो. तिथे आपण सगळे रोज एकमेकांना भेटतो, आपली सुख – दुःखे खुल्या मनाने एकमेकांना सांगतो, रोजचा आर्थीक व्यवहार आपल्याच मानसांशी असतो व मदतही आपलीच माणसं करत असतात. आपल्या घरावर संकट आल्यास संकटकाळी आपल्याच गावची मानस आपल्यासाठी धावून येतात. पण आपण पक्षीय राजकारण गावात करायला लागलो अन् गावाचा सत्यानाश केला.
ग्रामपंचायत निवडणूकीत आपल्याच मानसांच्या विरोधत आपण उभं टाकतो. इथेच मन दुभंगतात आणि जवळचे भाऊबंद व मित्र कायमचे वैरी होतात. चारदोन पुढारी आपला स्वार्थ साधण्यासाठी गावाला कायम अंधारात लोटतात. यामुळे ना गावचा धड विकास होतो ना लोकांमध्ये एकोपा राहतो.
पण शेवटी एक सांगतो, सगळीकडे काही निराशाजनक स्थिती नाही. आजही काही लोकं गावाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. प्रामाणिकपणे व तळमळीने काम करु इच्छिणाऱ्या लोकांना संधी देवून त्यांच्या जोडीला गावातील सगळ्यांच्या सहकार्याने विकास करणे शक्य आहे.
अंतिमत: गावाला वैभवसंपन्न व समृद्ध बनवण्यासाठी चांगल्या लोकांच्या हाती सत्ता द्या. यासाठी तळमळीने व प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते बिनविरोध निवडा. त्यातून सरपंच – उपसरपंच निवडा. या सगळ्या लोकांकडून पाच वर्ष प्रामाणिकपणे व पारदर्शक पद्धतीने गावचा कारभार केला जातोय का? हे तपासण्यासाठी व मार्गदर्शनासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिकांची समीती नेमता येईल. वाटल्यास त्यात चार सदस्य बाहेरगावी शहरात नौकरी – व्यवसाय करणा-या लोकांचा समावेश करतां येईल. जेणेकरून त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा गावांसाठी होईल. अशा समीतीमार्फत दर तीन महिन्यांनी बैठक घेऊन गावच्या विकासासाबाबत आढावा घेता येईल.
विचार करा, शेवटी तुम्हाला एक क्वश्चन मार्क सोडुन जातोय – पॅनेल तयार करुन, गटतट उभारून, लोकांना पैसे व दारु वाटुन, आपापसात भांडणे लावून निवडुन येणारे गाव पुढारी गावचा विकास करतील?
– बळवंत शिंदे
मो.9923333959
Gram Panchayat very very nice 🙂🙂moment