
म्हणजे हे पत्रक बातमीसाठी घेताना आपल्याला इतिहासाचा ढोबळ कालखंड तरी माहीत असावा.
आज बातमीदार किंवा पत्रकावरून बातम्या करणारे संपादकीय विभागातील लोक उद्या संपादक होऊ शकतात. त्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात यायचे असेल तर चौथी ते बारावीचा इतिहास पुन्हा एकदा वेळ काढून वाचावा.
केवळ इतिहास वाचणे पुरेसे नाही. त्यासोबत भूगोलही पक्का असावा. एकदा एक विद्यार्थी शिक्षणासाठी आॅस्ट्रेलियाला गेला. तर बातमीदाराने लिहिले होते ‘साता समुद्रापार झेप.’ किमान आपल्या राज्याची जमीन कुठे उंच आहे? कुठे खोल आहे? सह्याद्री कसा पसरला आहे. त्यामुळे कुठे जास्त पाऊस पडतो?
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना वेगवेगळ्या गडांमधील अंतरे, त्यांची ठिकाणे नकाशात तरी पाहून लक्षात ठेवावी. एकंदरीत तिसरी ते दहावीचा भूगोल पक्का करावा. यात पीकपाणी आणि संस्कृतीचाही अभ्यास होऊन जातो.
भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाच्या कलमांचीही नोंद पत्रकाराने आपल्या डायरीत करावी. जी कलमे मानवाधिकाराशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ कलम 19 ते 24, धर्मस्वातंत्र्याशी संबंधित 25 ते 28 इत्यादी.
राज्यघटना आता कधीही नेटवरून पाहता येते. तिचे एकदा पूर्ण अवलोकन करावे.
भारतीय दंडविधानही सतत सोबत असावे.
भारतीय राजकारणातील विविध टप्पे आणि कालखंड एकदा वाचून घ्यावेत. त्यासाठी डाॅ. भा. ल. भोळे यांचा ‘भारतीय शासन आणि राजकारण’ हा ग्रंथ, मधुकर भावे लिखित ‘यशवंतराव ते विलासराव’ आणि वेळोवेळी प्रकाशित होणारे शासकीय प्रकाशनाचे ग्रंथ वाचावे.
आजपर्यंतचा राजकारणाचा इतिहास वाचून झाला की वर्तमानात काय घडते यावर आपले लक्ष असतेच. त्यामुळे आजचे वर्तमानपत्र उद्याची रद्दी नसते, तर तो उद्याचा इतिहास असतो.
विविध धर्मांचे मूलभूत तत्त्वज्ञान पत्रकाराने माहीत करून घ्यावे. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा या आस्तिक दर्शनांची किमान तोंडओळख करून घ्यावी. जैन व बौद्ध या दर्शनांचा परिचय करून घ्यावा.
मुस्लिम धर्मात अल्लाहशिवाय कुणापुढेही झुकणे, हे मोठे पाप गणलेले आहे. त्यामुळे ‘वंदे मातरम्’ ही घोषणा त्यांना देता येत नाही. आई-वडिलांच्याही पाया पडता येत नाही.
मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन्हींच्या अनुयायांना धर्मप्रसार हे कर्तव्य सांगितलेले आहे. किमान शेजार्याला तरी तुम्ही तुमच्या धर्माविषयी सांगावे. तो धर्मांतर करो किंवा न करो. त्याला आमंत्रण देणे हे कर्तव्य म्हणून त्यांना करावे लागते. ही सामान्य माहिती पत्रकार म्हणून आपल्याला असली पाहिजे.
शिखांची गुरूपरंपरा, अग्निपूजक पारशी नागरिकांचा धर्म आणि परंपरा माहीत करून घ्याव्यात.
तंत्रज्ञानाची प्राथमिक माहिती पत्रकाराला असावी. शाळेतले विज्ञान म्हणजेच रसायन, भौतिक, जीवशास्त्र समजून घ्यावे.
वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला तर उत्तमच. नाही तर कोणत्याही घटनेला ‘चमत्कार’ म्हणून बातमी दिली जाते. नंतर त्या चमत्काराचे पितळ कुणी उघडे पाडले की पत्रकारही तोंडावर पडतो.
शेती, व्यापार, उद्योग, अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार समजून घ्यावा. अच्युत गोडबोलेंचे ‘अर्थात्’ वाचून घ्यावे.
कारकीर्दीच्या सुरुवातीला इंग्रजी एकदाचे शिकूनच घ्यावे.
संस्कृत आणि उर्दूची प्राथमिक माहिती मराठी लिखाण मजबूत करील.
शब्दलेखनः अनेक पत्रकारांना दृष्ट आणि दुष्ट यातला फरक माहीत नसतो. आजकाल तर ‘दगडे पडली’, ‘दरवाजे उघडली’, अशी भाषा छापून येत आहे. पुल्लिंगी नामाचे अनेकवचन असे कसे होऊ शकते?
नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन असे लिहिता येते. जसे फुले पडली, पुस्तके उघडली वगैरे.
र्हस्व आणि दीर्घ हे उच्चारानुसार ठरतात. ते एकदा समजूनच घ्यावे.
1. पूर्ण, कीर्तन, कीर्ती, सूर्य, चूर्ण या शब्दांमध्ये पुढे रफार गेल्यामुळे अलीकडचा ऊकार आणि वेलांटी दीर्घ लिहावी.
2. ऊन आणि हून प्रत्यय नेहमी दीर्घ लिहावे. जसे पाहून, मरून, सजून, लाजून इत्यादी.
3. आणि, परंतु हे शब्द र्हस्वच लिहावेत.
4. परीक्षा मध्ये ईक्ष् हा दीर्घ धातू असल्यामुळे नेहमीच री ची वेलांटी दुसरी द्यावी. ‘परिक्षा’, ‘परिक्षेला’ असे लिहू नये. याच ईक्ष् पासून बनणारे परीक्षण, निरीक्षक, अधीक्षक यातील वेलांटी दीर्घ आणि परिवीक्षा मधील वी दीर्घच लिहावा. (या विषयावर पत्रकार व शिक्षकांसाठी मी तासाभराची मोफत कार्यशाळाही घेतो.)
हे साधे, सोपे नियम एकदाचे समजून घ्यावेत आणि टायपिंग करताना हाताला तशी सवय लावावी. यासाठी प्रा. यास्मिन शेख यांचा ‘मराठी शब्दलेखनकोश’ सतत हाताळावा.
एकंदरीत काय तर पत्रकाराने सर्व काही वाचावे.
माणसे तर तो रोजच वाचत असतो.
– विनोद जैतमहाल
संचालक व प्रशिक्षक
स्पीकर अकॅडमी, जालना
(भाषणकलेची onlineकार्यशाळा),
माजी संपादक, दै. आनंद नगरी, जालना,
माजी उपसंपादक दै. दिव्य मराठी, औरंगाबाद.
9823028332.