डॉ. कृष्णा शेषराव जगदंबे
इंटरव्हेंशनल पेन फिजिशियन व कन्सलटंट अनास्थेशिस्ट
नांदेड ..
मनुष्य प्राणि जन्म घेतो त्या क्षणापासून तो वेदनां ना सामोरा जात असतो. मुलाचा जन्म होताच नाळ कापताच बाळाचा येणारा आवाज आपल्या कानाला सुखकर वाटतो,कारण तो क्षण आपल्यासाठी आनंदाचा असतो.रडण्याच्या प्रत्येक हुंदक्यागणिक तो जीव या जगाचा अनुभव घेत असतो.पण बाळ रडतं याचाच अर्थ त्याला वेदना होत असतात.फक्त त्याला त्या सांगता येत नाहीत. कालांतरानी त्या वेदना नाहिश्या होतात कारण त्या तात्कालिक स्वरुपाच्या असतात.
साधारणतः वेदनांनचे दोन प्रकार असतात. तात्कालिक वेदना व दीर्घकालीन वेदना.तात्कलीक वेदना या नावाप्रमाणे तात्पुरत्या काळापुरत्या मर्यादित असतात ,कालांतराने औषधोपचारानी त्याचे निराकरण होते.दीर्घकालीन वेदना म्हणजे ज्या वेदना ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ असतात त्याला दीर्घकालीन वेदना असे म्हणतात. तात्कालिक वेदनांनचा योग्य उपचार न झाल्यास त्याचे रुपांतर दीर्घकालीन वेदनेत होते वेदनानिवारण शास्त्र हे नजीक काळात प्रगत झाले. पाश्चात्य देशात मनुष्यजीवाला खुप महत्व आहे,माणसाला वेदनांपासून मुक्ती कशी देता येइल यावर बरेच संशोधन झाले .
साठच्या दशकात डाॅ.बोनिका यांनी वेदना निवारण शास्त्र हे शास्त्र म्हणून नावारूपास आणले.कालांतराने या विषयात बरेच संशोधन झाले. आता जगात वेदनानिवारण शास्त्र हे प्रगल्भ झालेले आहे. परंतू अजूनहि भारतात त्याची व्याप्ती वाढली नाही ,करण आपल्या कडे वेदना बरी होण्याची नव्हे तर सहन करण्या ची गोष्ट आहे असा समज आहे.आजार बरा झाला कि आपोआप वेदना बरी होते असा उपदेष सर्व जण देत असतात.ज्यावर वेळ असते त्याचा त्रास त्यालाच कळतो.या दीर्घकालीन वेदनांवर निश्चितपणे उपचार करता येऊ शकतात.दीर्घकालीन वेदना अंगावर घेऊन अश्वत्थामासारखे आयुष्य जगण्याची काही गरज नाही.
पूर्वी सांगितल्या प्रमाणे वेदना 2 प्रकारच्या असतात,तात्कलिक व दीर्घकालीन. तात्कालीक वेदना साधारणपणे आजाराबरोबर नाहीशा होतात.जसे अॅपेंडिक्सचे दुखणे,ह्रदयाचे दुखणे,आॅपरेशनच्यावेदना, फ्रॅक्चर च्या वेदना ई. दीर्घकालीन वेदना या शरीरात वर्षानूवर्ष घर करुन राहतात.जसे कॅन्सर चे दुखणे, पाठदुखी , मानदुखी, डोकेदुखी ट्रायजेमिनल न्युरालजिया,नागिणीचे दुखणे हे सर्व प्रकार दीर्घकालीन दुखण्यात मोडतात.ही दुखणी सहन करणे म्हणजे निव्वळ आपल्या शरीराला यातना देण्यासारखे आहे.
वेदनारहीत जीवन हा मानवी अधिकार आहे.तो मागणे आणि देणे हे मानव जातीचे आद्य कर्तव्य आहे.माणुस वेदनेमध्ये असल्यास त्याचा त्याच्या शरीरातील सर्व अवयवांवर परीणाम होतो उदा. ह्रदय,मेंदु, श्वासाची गती ई. थोडक्यात ह्रदयाची गती वाढणे, श्वासाची गती वाढणे,चीडचीडेपणा, कामात लक्ष व लागणे अशी लक्षणे दिसु लागतात.
वेदना निवारण तज्ञ वेदनेकडे एका वेगळ्या द्रुष्टीकोनातून बघतो. दीर्घकालीन वेदना हा एक आजार असुन त्यावर उपचार उपलब्ध आहेत. तात्कालिन वेदना निवारण या मध्ये वेदनेचे कारण समजावून घेऊन बाकी उपचारांसोबत रुग्ण वेदनारहित कसा राहू शकेल हे बघण्यात येते.यासाठी वेगवेगळ्या स्वरुपाचे औषधोपचार नसांचे बधिरीकरण व इतर आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात येतो, जेणे करून बाकी उपचार पद्धती रूग्णाला सुस्ह्य व्हावी.याचा फायदा असा की रूग्णाची रीकव्हरी लवकर होते.त्यामुळे रूग्णाला लवकर सुट्टी (डिसचार्ज) मिळते त्या योगे पैशाची बचत होते.अभ्यासात असे लक्षात आले आहे की आॅपरेशननंतर वेदनारहीत रूग्ण लवकर बरा होतो.
वेदना निवारण शास्त्राचा दुसरा पण अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे दीर्घकालीन वेदनानिवारण .दीर्घकालीन वेदना हा येत्या शतकात आपल्याला भेडसवणारा मुख्य आजार होणार आहे.याला कारण आपली बदललेली जीवन पद्धती. दर पाच पैकी एक माणूस सध्या पाठदुखीनी ग्रासलेला आहे.दुखणे पण असे की जे दिसत नाही आणि सांगताही येत नाही.त्यामुळे कौटुंबिक व सामाजिक जीवनावर परीणाम होतो.चीडचीड होणे,कामावर लक्ष न लागणे,कामावर सुट्टी, काॅन्सट्रेशनची कमी होणे असे प्रकार घडतात.
पाठदुखीची कारणे अनेक असु शकतात पण यासर्वावर शस्त्रक्रिया हाच एक उपाय नाही, किंबहुना ९०% लोकांची पाठदुखी ही थोड्या पण योग्य उपचारानी नाहीसी होते.बऱ्याच प्रमाणात इंजेक्शन अथवा रेडीयोफ्रिक्वेंसी या नवीन उपचार पद्धतीनी आराम मिळतो.4-5% लोकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते.
पाठदुखी प्रमाणे अनेक दीर्घकालीन आजार असतात जसे मानदुखी, अंगदुखी. ही दुखणी त्या व्यक्ती साठी अतिशय त्रासदायक असतात. यावर उपचार आहेत याची जाणीव किंवा माहिती नसल्यामुळे अनेक जण हि दुखणी अंगावर काढत बसतात. ट्रायजेमिनल न्युरालजिया हे असेच एक भयानक दुखणे आहे. य़ा आजारामुळे त्रस्त म्हणजे बाॅलिवुड स्टार सलमान खान.वैद्यकिय भाषेत त्याला आत्महत्येचा आजार असे संबोधले जाते. यामध्ये रूग्णाच्या चेहराच्या एका भागावर प्रचंड वेदनेची कळ येते ,स्पर्शाने वारा लागल्यामुळे थंड पाणि प्यायल्यावर जेवताना, दाढी करताना या वेदनेची असह्य कळ येते.या आजारावर पण उपचार उपलब्ध आहेत.सर्वसाधारण पणे हा आजार नियंत्रित ठेवता येतो. क्वचित प्रसंगी रेडीयोफ्रिक्वेंसी ही उपचार पद्धती वापरावी लागते किंवा मेंदुची शस्त्रक्रिया करून यावर उपचार करता येतो.
कॅन्सर या आजाराबद्दल ची माहिती जनमानसात आहे.माणूस कॅन्सर पेक्षा त्यातून निर्माण होणार असलेल्या वेदनांना घाबरतो.सद्य परिस्थितीत वेदना निवारण शास्त्रामुळे वेदनांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येते .उर्वरीत आयुष्य रुग्ण वेदना रहित जगूशकतो. हे आता वेदना निवारण शास्त्रामुळे शक्य झाले आहे. कॅन्सरचे निदान होताच वेदना निवारण शास्त्राची मदत घेतल्यास वेदनेचे प्रमाण नियंत्रणात राहते.विविध औषधोपचारानी ,नसबधिरीकरण करून रूग्णाला प्रत्येक टप्प्यावर वेदनारहीत ठेवणे सहज शक्य आहे .यावर अनेक आधुनिक पद्धती आजकाल वापरण्यात येतात , जसे इन्ट्राथिकल पंम्प स्पायनल काॅर्ड स्टिम्युलेटर ह्या काॅप्युटराइज उपचार पद्धती असुन त्यात एक प्रकारचे यंत्र मज्जातंतू जवळ ठेवले जाते ज्यातुन वेदनाशामक औषधे मज्जातंतू जवळ सोडली जातात.
याचा कुठलाही भाग दर्शनिय नसतो .या मुळे रुग्णा च्या हालचालींवर कुठलाही परीणाम न होता सामान्य आयुष्य जगता येते . ही उपचार पद्धती जरा महाग असली तरी अत्यंत फायदेशीर आहे. या सर्व उपचार पद्धतींचा उद्देश एकच की रूग्णाला वेदनारहीत आयुष्य जगता यावे.
वेदनारहीत आयुष्य हा माणसाचा जन्मसिध्द हक्क आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हे वैद्यकिय शास्त्रातील लोकांचे आद्य कर्तव्य आहे. वेदनांना कोणी टाळू शकले नाही पण त्या सहन करणे न करणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे..
डॉ. कृष्णा शेषराव जगदंबे
M.B.B.S. D.A. FPM (Delhi)
इंटरव्हेंशनल पेन फिजिशियन व कन्सलटंट अनास्थेशिस्ट
नवजीवन पेन मॅनेजमेंट सेन्टर
बोरबन , नांदेड ..
संपर्क – ९९७०५९६६९५